हातकणंगले मराठा समाज समन्वय समितीचा खास . धैर्यशील माने यांना पाठिंबा

 

हातकणंगले , प्रतिनिधी :तालुक्यातील हातकणंगले, पेठवडगाव व हुपरी येथील शिवराज्य भवनसाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची मंजुरी, लोकसभेत मराठा आरक्षणासाठी उठविलेला आवाज, मराठा बांधवांना कुणबी दाखल्यांसाठी केलेला पाठपुरावा आदि मराठा समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेवून लोकसभा निवडणूकीसाठी हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्यावतीने खास. धैर्यशील माने यांना हातकणंगले येथील बैठकीत पाठिंबा जाहीर करण्यात आला.


ज्येष्ठ मराठा समन्वयक बी. एम. पाटील म्हणाले, खास . धैर्यशील माने यांनी मराठा समाजासाठी केलेले काम कौतुकास्पद आहे. मागील लोकसभा निवडणुकीतही त्यांना पाठिंबा दिला होता. निवडून आल्यानंतर त्यांनी नेहमीच मराठा समाजासाठी योग्य व्यासपीठावर आवाज उठविला आहे. म्हणून यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठीही त्यांना पाठिंबा देत आहोत. गावागावात मराठा भवन व्हावेत . यासाठी धैर्यशील माने यांनी भविष्यात काम करावे, अशी मागणीही पाटील यांनी केली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना निरीक्षक पांडुरंग पाटील म्हणाले, मराठाबांधवांनी धैर्यशील माने यांना पुन्हा खासदार करण्यासाठी जीवाचे रान करावे.
खास. माने म्हणाले, शिवराज्य भवन ही संकल्पना महाराष्ट्रात प्रथमच आपल्या मतदारसंघात राबवली असून हातकणंगले, वडगाव, हुपरी, शिरोळ, मलकापूर यासह विविध ठिकाणी शिवराज्य भवन उभारणी करिता कोट्यावधी रुपये मंजूर केले असून काही ठिकाणी प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षण, कुणबी दाखले यासह समाजाच्या कामासाठी प्रामाणिक काम केले असून भविष्यातही समाजबांधवांच्या कामासाठी तत्पर असणार आहे. निश्चितपणे मराठा समाजाला पाठबळ देण्याचे काम माझ्या हातून घडेल असा विश्वास देतो.


यावेळी मराठा महासंघाचे इचलकरंजी शहराध्यक्ष संतोष सावंत, समन्वयक सुनील काटकर, प्रवीण केर्ले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गजानन खोत यांनी केले. समन्वय समितीचे सदस्य रमेश पाटील यांनी आभार मानले. बैठकीस गोगा बाणदार, निशिकांत पाटील, रमेश घोरपडे, दिलीप खोत, अमित गर्जे, सचिन शिंदे, अरविंद माने, मिथुन जाधव, डॉ. प्रदीप पाटील, प्रा. राजाराम झपाटे, जयसिंग शिंदे, सदाशिव अपराध, डॉ. अभय यादव, संदीप पोवार, नितीन गायकवाड आदींसह मराठा समन्वयक समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समन्वय समितीचे सचिव भाऊसाहेब फास्के यांनी स्वागत व प्रास्ताविकात समितीच्या कार्याचा आढावा घेतला.