शरद पवार, सुशील कुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील हे जनतेच्या भविष्यासाठी नाही तर त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी एकत्र आले, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माढा येथील प्रचारसभेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ?
शरद पवार हे सुप्रिया सुळे यांच्यासाठी, सुशील कुमार शिंदे हे प्रणिती शिंदे यांच्यासाठी तर विजय सिंह मोहिते हे धैर्यशील मोहिते पाटलाच्या भविष्यासाठी एकत्र आले आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
यावेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढामध्ये केलेल्या विकास कामाचा आढावा दिला . रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर त्यांनी फ्लड इरिगेशन प्रकल्पासाठी मोठे प्रयत्न केले. त्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, आम्ही अनेक बैठका घेऊन दुष्काळी भागाला पाणी कसे पुरवता येईल, यासाठी प्रयत्न केले. त्याचा एक भाग म्हणून आम्ही पुराचे वाहून जाणारे पाणी कॅनलद्वारे उजणी धरणापर्यंत नेले. त्यासाठी मोदींच्या माध्यमातून जागतिक बॅंकेकडून निधी आणला आणि दुष्काळी भागात पाणी पोहोचण्याच काम आम्ही केलं, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार झाल्यानंतर माढामध्ये पाणी आणले, रेल्वे आणली अशी विविध विकासकामे त्यांनी केली. त्यामुळे या निवडणुकीत ते पुन्हा खासदार म्हणून निवडणून येतील असा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
