कोल्हापूर प्रतिनिधी : काँग्रेसला जे ४०-५० वर्षात जमले नाही ते मोदी यांनी दहा वर्षात केले म्हणणाऱ्या हसन मुश्रीफ यांना असे विधान करताना लाज कशी वाटली नाही? काँग्रेस होती म्हणून तुमच्यासारखा अल्पसंख्याक समाजातील माणूस आमदार झाला हे विसरू नका..असे प्रत्युतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांनी मुश्रीफ यांना पत्रकाद्वारे दिले.

या पत्रकात असं म्हटलआहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी 40 वर्षात काँग्रेस पक्षाने काय केले असे आपल्या भाषणात विचारले. खरे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसींचे आरक्षण काढून मुस्लिम लोकांना देणार आहेत असे विधान केले आहे. हे विधान मुळात मुस्लिम यांना मान्य आहे का? गेल्या 40 वर्षात जर देशात काँग्रेस पक्ष नसता तर कोणतीही घराण्याची पार्श्वभूमी नसताना सामान्य मुस्लिम कार्यकर्त्याला विविध स्वराज्य संस्था आमदारकी मंत्रीपद मिळाले असते का? गेल्या 40 वर्षात काँग्रेसच्या पुरोगामी विचारांमुळेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती आमदार आणि मंत्री आहे. वरील विधान करण्यापूर्वी मंत्री मुश्रीफ यांनी एवढा तरी विचार करायचा की भाजपकडून आपल्याला आमदारकी मंत्रीपद राहू दे ग्रामपंचायतीमध्ये तरी संधी मिळाली असती का..? आतापर्यंत इडीला घाबरून तुम्हीच ज्यांना वडिलासमान मानत होता त्या शरद पवार यांच्याविरोधात बोलू लागला..आता त्याच्या पुढे जाऊन ज्या पक्षाने आपल्याला आमदार, मंत्री केले, अल्पसंख्याक समाजातील नेता म्हणून राजकारणाला बळ दिले त्या पक्षाने काय केले म्हणून विचारणा करून तुमच्या राजकारणाची पातळी किती घसरली आहे हेच दाखवून दिले आहे.. ज्यांच्यासाठी आज तुम्ही हे सगळं करत आहात त्या भाजपने तुमच्या ढुंगणाखाली आताच बॉम्ब लावला आहे..त्यामुळे काही झाले तरी आपण विधानसभेला निवडून येत नाही ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे..आपण मोदी यांना रामलल्लाच्या कितीही मुर्त्या भेट दिल्या तरी तो राम आता आपल्या सारख्या गद्धारांना पावणार नाही हे लक्षात ठेवा.. आणि एवढेच जर भाजपबद्धल प्रेम उफाळून आले असेल तर ज्या काँगेसच्या मतावर तुम्ही निवडून आला त्या आमदारकीचा राजीनामा द्या आणि मग खुशाल भाजपच्या पालखीचे भोई व्हायला जा.. असा सल्लाही व्ही.बी.पाटील यांनी मुश्रीफ यांना पत्रकातून दिला आहे.

