उंचगाव : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उंचगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महिला महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच सारिका माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महिला महोत्सव विषयी अधिक माहिती देताना सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले,उंचगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ८ मार्च ते ११ मार्च असे चार दिवस कार्यक्रम होणार आहेत.
पहिल्या दिवशी कुंकूमार्चन सोहळा होणार असून यावेळी आमदार ऋतुराज पाटील या ठिकाणी भेट देणार आहेत. १५०० मेहंदी कोन, द्रोण , पत्रावळी, कुंकू , लक्ष्मी पावले, श्रीयंत्र ,ओटी असे सर्व साहित्य ग्रामपंचायतीकडून महिलांना देण्यात येणार आहे.
दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी खाऊ स्टॉलचे आयोजन करण्यात आले असून महिला बचत गटांना येथे विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.शेवटच्या दिवशी म्हणजेच दिनांक ११ रोजी भव्य रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या ६० स्पर्धकांना यामध्ये सहभाग घेता येणार आहे. तसेच महिला दिनानिमित्त १ ते ६ वॉर्ड मधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात येणार असून या दिवशी महिलांचा फेटा बांधूनही सत्कार करण्यात येणार आहे.दुपारी ४ वाजता होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. या सांगता समारंभाला महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती असणार आहे.यावेळी या पत्रकार परिषदेस ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील, नीता हावळ ,राहुल मोळे ,विराग करी, श्रीधर कदम आदी उपस्थित होते.