सभासद, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे शाहू यशाची नवनवीन शिखरे पार करीत आहे: राजे समरजितसिंह घाटगे

कागल: कारखान्याचे सभासद व कर्मचारी हे दोन्हीही घटक महत्त्वाचे आहेत. कारखान्याच्या एकूणच वाटचालीत सभासदांचे सततचे सहकार्य व कर्मचाऱ्यांचे परिश्रम, यामुळेच शाहू साखर कारखाना यशाची नवनवीन शिखरे पार करीत आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. येथे कारखान्याच्या ४७ व्या वर्धापनदिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरवातीस कारखाना प्रांगणातील छत्रपती शाहू महाराज व कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या पुतळ्यास कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून कारखाना सेवेतून निवृत्त झालेल्या दहा कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब सत्कार केला.तसेच कारखाना सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीचे धनादेशही घाटगे यांच्या हस्ते वितरित केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, आजी- माजी संचालक-संचालिका यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद शेतकरी, अधिकारी-कर्मचारी, यांच्यासह तोडणी वाहतूक कंत्राटदार, पुरवठादार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घाटगे पुढे म्हणाले स्व. राजेसाहेब यांनी कारखान्याची गाळप क्षमता वाढवणे बरोबर नवीन नवीन उपपदार्थ निर्मिती प्रकल्प यशस्वीपणे उभारले. त्यांच्या पश्चात त्यांनी निर्माण केलेल्या आदर्र्शांची जपणूक करतांना कारखान्याच्या इतिहासातील सर्वात मोठे विस्तारीकरणाचे काम नियोजीत वेळेत पूर्ण केले आहे. यामधे कर्मचाऱ्यांच्या मोलाचा वाटा आहे. तसेच नव्याने हाती घेतलेल्या उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्पही पूर्णत्वास आले आहेत. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्यावतीने राजेंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले. आभार शशिकांत धनवडे यांनी मानले.

मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही पुरस्कार स्वीकारण्याची संधी मिळणार…

समरर्जीतसिंह घाटगे म्हणाले, कारखान्याच्या प्रगतीमध्ये सभासदांचे बरोबर कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन यावर्षीपासून बक्षीस स्वीकारण्याचा मान निवडक कर्माच्याऱ्याना देणेत आला. यापुढे मयत कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांच्या वारसांनाही पुरस्कार स्वीकारण्याची संधी दिली जाईल त्यामुळे आता मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही कारखान्यास मिळालेला पुरस्कार स्वीकारण्याची संधी मिळणार आहे.