मुंबई : एका सर्वेक्षणानुसार लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा आठवा क्रमांक आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे.
मूड ऑफ दी नेशन पोल या शीर्षकाखाली देशातील 10 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात सर्वसामान्यांचे पंतप्रधान अशी स्वत:ची ओळख सांगणारे एकनाथ शिंदे थेट आठव्या क्रमांकावर आहेत. तर, पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा क्रमांक आहे. विशेष म्हणजे, एम के स्टॅलिन (तामिळनाडू), नवीन पटनायक (ओदिशा), सिद्धरामय्या (कर्नाटक), आणि हेमंत बिस्वा शर्मा (आसाम) मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढे आहेत.
यावरून आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत 2021मधील अशाच सर्वेक्षणाची आकडेवारी दिली आहे. त्यामध्ये पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चौथ्या क्रमांकावर आहेत. यासोबतच, लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत आधी महाराष्ट्र टॉप 5मध्ये असायचा, आता टॉप टेनमध्ये असतो; फरक स्पष्ट आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.