मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा गुंड निलेश घायवाळ याचा फोटो ट्विट केला होता. या मुद्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत.
या सरकारनं नवनवीन आयडिया करणं आणि त्यातून पैसा मिळवण्याचा धंदा सरकारनं सुरु केलेला आहे. कायदा व सुव्यवस्था किंवा इतर विषय संपलेले आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेला गुंड मंत्रालयात रील तयार करतो. गुंड निलेश घायवाळ जामिनावर आहे. तो मुख्यमंत्र्यांना भेटतो, मंत्रालयात रील तयार करतो. गुंडांना संरक्षण देणारं आणि गुंडांना पोसणारं हे सरकार आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अभिनंदनास पात्र आहेत. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेत्यांनी केली.