भीमराज की बेटी मै तौ जयभीमवाली हूँ’ फेम किरण पाटणकर यांचे निधन

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवमुक्तीचे तेजस्वी आंदोलन गावागावात पोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणारे लोककवी नागोराव पाटणकर यांच्या कन्या व प्रख्यात बौद्ध-भीम गीत गायिका किरण पाटणकर-रोडगे यांचे ५ फेब्रुवारी रोजी आजाराने निधन झाले. त्या ६२ वर्षांच्या होत्या. आघाडीचे आंबेडकरी प्रबोधनकार गायक कवी प्रकाशनाथ पाटणकर यांच्या भगिनी आहेत. त्यांच्या मागे १ मुलगा व मोठा आप्त परिवार आहे. सायंकाळी वैशालीनगर घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किरण पाटणकर यांनी अनेक बुद्ध-भीम गीते गायली होती. ‘भीमराज की बेटी मै तौ जयभीमवाली हूँ’ हे त्यांचे गाणे विशेष गाजले होते. नंतरच्या काळात त्यांनी राजकारणात प्रवेश केला व २०१४ साली बहुजन समाज पार्टीतर्फे रामटेक लोकसभा निवडणूक त्यांनी लढविली होती. नागपूर महापालिकेत बसपाच्या नगरसेविका म्हणूनही त्या निवडून आल्या होत्या. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्रातील हानी झाल्याची प्रतिक्रिया बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी व्यक्त केली.

तूम तो ठहरे… च्या मूळ गायिका

प्रसिद्ध गायक अल्ताफ राजा यांच्या आवाजातील ‘तूम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे, सुबह पहले गाडीसे तुम तो चले जाओगे’, हे गाणे प्रचंड गाजले होते. नागपूरच्या मोमीनपुरा भागात राहणारे जहीर आलम यांनी हे गाणे लिहिले होते. मात्र अल्ताफ राजाच्या आवाजात हे गाणे येण्यापूर्वी अनेक वर्षे किरण पाटणकर हेच गाणे मंचावर सादर करीत होत्या.