कसबा बावडा : रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅब मुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यामध्ये विकास घडून येईल व रोबोटिक क्षेत्रातील उत्तम अभियंते घडतील असा विश्वास डॉ. संजय डी. पाटील यानी यावेळी व्यक्त केला. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅबच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. यावेळी विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. संजय पाटील म्हणाले, या लॅबमुळे नवीन रोबोट्स, ड्रोन, मेकॅट्रोनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बनविण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल आणि करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतील. भविष्यात रोबोटिक्स आणि एआयएमएल सारख्या आधुनिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी एक मोठा अनुभव मिळणार आहे. या लॅब मुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यामध्ये विकास घडून येईल.
विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांची कल्पकता व कृतीशीलता याला या लॅबमुळे अधिक चांगले व्यासपीठ मिळेल. विविध रोबॉट्स आणि किट्समुळे मेकॅनिकल इंजीनीरिंगचे विद्यार्थी जागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञान निर्माण करू शकतील. कोल्हापूर शहरात अत्याधुनिक प्रोजेक्ट्स आणि प्रोडक्टस निर्माण करण्यसाठी या लॅबमधील अनुभवाचा विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोग होईल.
कार्यकारी संचालक डॉ. अनिल गुप्ता म्हणाले, जागतिक पातळीवर रोबोटिक तंत्रज्ञानाची मागणी सतत वाढत जाणार आहे. रोबोटिक कार्यपद्धती व कौशल्य यांचा विकास करून विद्यार्थ्यांमधून कुशल अभियंते घडवण्यासाठी हि लॅब नक्कीच मोठे योगदान देईल.
मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुनील रायकर यांनी रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅबमध्ये उपलबद्ध यंत्रणा व कार्यपद्धती याबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करता यावा आणि एआय-एमएल आणि इंडस्ट्री ४.० सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यास करणे सोपे व्हावे यासाठी ही लॅब उभारली आहे. या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, मेकॅट्रोनिक्स, एआय संबंधित प्रोजेक्ट्स बनवता येतील. रोबोटिक आर्म, AI आणि ML चा वापर करणारे रोबोट्स तसेच सेन्सर्स आधारित नवनवीन रोबोट्स बनवता येतील अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याठिकाणी विद्यार्थ्याना रोबॉट्स मॅन्युफॅक्चरिंगचा प्रात्यक्षिक अनुभव घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना आयओटी आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम्स तयार करता येतील असे अडवान्स किट्स आहेत. यामध्ये विविध सेन्सॉरस किट्स, विविध प्रकारचे मोटर्सचा तसेच अत्याधुनिक कंट्रोलरचा समावेश करण्यात आला आहे.
यावेळी सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, अधिष्ठाता संशोधन डॉ. अमरसिह जाधव, मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुनील रायकर, लॅबचे समन्वयक प्रा. पंकज नंदगावे व प्रा. विनय काळे यांच्यासह विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.