कोल्हापूर (प्रतिनिधी) पंचायत समिती असो वा जिल्हा परिषद या ठिकाणी पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यामध्ये चांगला समन्वय असेल तरच विकासात्मक कामे होतात असे, उद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चौथा मजला इमारत उदघाटन समारंभ कार्यक्रमात काढले.
चौथ्या मजला इमारतीसाठी नाम. मुश्रीफ यांनी ग्राम विकास मंत्री असताना 10 कोटी इतका निधी मंजूर केला होता. या इमारतीचा लोकार्पण सोहळा आज (शुक्रवारी) 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी संपन्न झाला.
यावेळी नामदार म्हणाले जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्यासाठी अनेक वर्ष सातत्याने मागणी होत होती आज ही सुंदर अशी इमारत पाहून आपल्याला आनंद झाला. सर्व कार्यालय एका ठिकाणी आल्यामुळे नागरिकांची चांगली सोय होईल यामुळे जिल्ह्यातील विकास कामाला चांगली गती प्राप्त होईल.
यावेळी खासदार संजय मंडलिक म्हणाले, जिल्हा परिषदची इमारत आता खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाले असून जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी ज्या जुन्या इमारती आहेत त्या जिल्हा परिषदेने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी देखील विकासात्मक दृष्टिकोन राबवावा. जुन्या सभागृहाचे देखील आधुनिकीकरण करण्यात येत असल्यामुळे सदस्यांसाठी ही एक आनंदाची बाब असल्याचे खासदार मंडलिक म्हणाले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारी अधिकारी असतील तर प्रत्येक काम कमी वेळेत पूर्ण होतात. पंतप्रधान मोदी यांची विकसित भारत ही संकल्पना सर्वत्र चांगल्या पद्धतीने राबवण्यात आली. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनेही ही योजना अतिशय चांगली राबवली गेली याबद्दल महाडिक यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. टॉपिक वाचला की आशय समजतो अशा प्रकारचे काम नामदार मुश्रीफ यांचं असल्याचं सांगून त्यांनी मुश्रीफ यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं. केंद्रातून जिल्हा परिषदला काही मदत लागत असेल ती करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
*नामदार मुश्रीफ व खासदार मंडलिक यांची टोलेबाजी*
नामदार मुश्रीफ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना म्हणाले, ज्येष्ठ माजी सदस्य अरुण इंगवले हे माझ्या मनातील अध्यक्ष आहेत. तर निवडणुका कधी लागणार यावर खासदार मंडलिक म्हणाले ते मुश्रीफ साहेबांनाच विचारा यावर सभागृहात जोरात अशा पिकला.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहूल रेखावार, आयुक्त, श्रीमती के.मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी.सी.पाटील ,राहूल पाटील, बजरंग पाटील, व माजी सभापती, अंबरिश घाटगे माजी जि.प.सदस्य अरुण इंगवले, विजय भोजे, मनोज फराकटे, विनय पाटील, मनिषा कुरणे, रेखा खमलेट्टी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये जिल्हा पारिषद इमारती बाबतचा पूर्व इतिहास सांगून पंचायत समिती करवीर करिता नवीन इमारत त्याचप्रमाणे राधानगरी व गगनबावडा इ.दुर्गम तालुक्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची मागणी केली.
यावेळी नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते कोविड-19 काळात कर्तव्य बजावत असताना मृत्यु झालेले कर्मचारी कै.भिमराव तानाजी कुरणे, कै.सदाशिव भाऊ नाईक व कै.शब्बीर बाबालाल पाटणकर या कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी र.रु.50.00 लाखाचा निधीचा धनादेश वितरीत करणेत आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे खातेप्रमुख , अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बांधकाम कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.