पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतुचे उद्घाटन…

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अटल सेतूचे उद्घाटन झाले आहे. यावेळी खारकोपर-उरण रेल्वे आणि दीघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. रायगडमध्ये तिसरी मुंबई रायगड जिल्ह्यात उभी राहणार, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.यावेळी पंतप्रधानांना राम मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण भाषण हे हिंदीतून केले असून या भाषणात त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.

अजित पवार म्हणाले, “आज मुंबईनंतर दुसरी आणि आता तिसरी मुंबई रायगड जिल्ह्यात तयार होत आहे. या तिसऱ्या मुंबईला अटल सेतूमुळे खूप मोठा फायदा होईल. रायगडपासून मुंबईला जाण्यासाठी दोन ते अडीच तासाचा प्रवास फक्त 25 मिनिटात होणार आहे. यामुळे इंधन आणि पैशाची बचत होणार आहे. या सेतूमुळे रायगडवासियांच्या जीवनात खूप चांगले बदल होणार आहेत. हा सेतून मुंबईसारख्या महानगरला ग्रामीण भागाशी जोडणारा सेतू आहे.”

देशातील सर्वात मोठा सागरी सेतू

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत अजित पवार म्हणाले, “2014 साली जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हातात घेतली होती. यानंतर पंतप्रधानांनी स्त्री शक्तीचे सशक्तीकरण आणि देशातील माता भगिनींच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक प्रकल्प सुरू केले. उज्ज्वला योजना हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. उज्ज्वलाच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. आज मुंबई ते रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूचे उद्घाटन झाले आहे. हे आपल्या महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की, देशातील सर्वात मोठा सागरी सेतू हा आमच्या सरकारने बनवला आहे.”

पंतप्रधानांनी भारतीय रेल्वेचा चेहरा बदलला

अजित पवार म्हणाले, “यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते खारकोपर-उरण रेल्वे आणि दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. मोदी सरकारमुळे भारतीय रेल्वेचा चेहरा बदलला आहे. वंदे भारत ट्रेनसारखी वेगवान ट्रेन आता भारताच्या कानाकोपऱ्यात धावत आहे. यामुळे ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचा सर्वसामान्य प्रवासींचा सोपा होत आहे. सर्वसामान्यांचा विचार करणे आणि त्यासाठी स्व:ताला झोकून देऊन काम हे मोदी सरकारची सर्वात मोठे यश आहे.”