गोकुळची दिनदर्शिका किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरेल : अरुण डोंगळे

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२४ या नवीन वर्षात गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ व अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले.

 या दिनदर्शिकेमध्ये गोकुळमार्फत दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आधुनिक व विस्तृत माहिती तसेच दूधवाढीसाठी आवश्यक वैरण विकास, आहार संतुलन, जातिवंत म्हैस खरेदी, बायोगॅस, सुधन सेंद्रिय खते, आयुर्वेद उपचार, वंध्यत्व निवारण, टी.एम.आर, मिनरल मिक्श्चर, मुक्त गोठा, अचूक रोगनिदान करणारी प्रयोगशाळा या सर्व विषयावर प्रबोधनात्मक माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आली आहे.

यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळची दिनदर्शिका ही गोकुळचा दूध उत्पादक आणि संस्था यांच्या औत्सुक्याचा विषय असतो. दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन दूध उत्पादकांचे व दूध संस्थाचे प्रबोधन होण्यासाठी गोकुळ दूध संघामार्फत दरवर्षी दिनदर्शिका प्रसिद्ध केली जाते. ही दिनदर्शिका कमीत कमी कष्टात, कमी खर्चात किफायतशीर दुग्ध व्यवसाय करण्यासाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरेल. 

यावर्षीच्या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर मांडलेल्या विषयाची अधिक माहिती कायमस्वरूपी संग्रही ठेवायची झाल्यास प्रत्येक पानावरील उजव्या कोपऱ्यात क्यू.आर. कोड देण्यात आला आहे. हा कोड आपल्या स्मार्ट फोनने स्कॅन केल्या नंतर त्या विषयाचा लिखित तपशील आणि व्हिडीओ दूध उत्पादकास बघता येईल. या माहितीचा उपयोग नित्यनेमाने किंवा गरजेनुसार करणे दूध उत्पादकास सहज सोपे होणार आहे असे मनोगत व्यक्त केले. या दिनदर्शिका संघाशी सलग्न सर्व प्राथमिक दूध संस्थाना देण्यात येणार आहेत.

यावेळी मा.चेअरमनसो यांनी संघाचे अधिकारी,कर्मचारी,दूध उत्‍पादक,दूध संस्था,वितरक व ग्राहक तसेच दूध वाहतूक ठेकेदार यांना नवीन वर्षाच्या गोकुळ परिवारातर्फे शुभेच्‍छा दिल्‍या.

          यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, अंबरिषसिंह घाटगे,चेतन नरके, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ.शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले इतर अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.