पुणे : समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरातून राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशभरात सर्वच ठिकाणी हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण तयार झालं आहे. काही राज्यांमध्ये धुक्याचा प्रादुर्भाव देखील दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील विदर्भात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षाही खाली गेला. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली होती. मात्र, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात पुन्हा एकदा बदल घडून येत आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या ५ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडू शकतो. येत्या दोन दिवसांत विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे.पुण्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही आणि विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, सोमवारी गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. गोंदियातील तापमान १२.४ अंश सेल्सिअस इतके होते.
हवामान खात्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांना देखील पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ५ जानेवारीपासून दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तरेकडील राज्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मंगळवार आणि बुधवारी हलका पाऊस पडू शकतो.