टेस्लाने भारतात गुंतवणूक करण्याचे  दिले संकेत…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूएस दौऱ्यादरम्यान इलॉन मस्क यांची भेट झाली होती. भेटी दरम्यान टेस्लाने भारतात गुंतवणूक करण्याचे संकेत दिले होते. टेस्लाने एक वर्षापूर्वी भारतात जास्त आयात शुल्कामुळे भारतात गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला होता.अर्थ मंत्रालयाने गुरुवारी या संदर्भात माहिती दिली आहे. 

आता टेस्लाने निर्णय बदलला आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही अमेरिकेतील टेस्ला प्लांटला भेट दिली होती. इलॉन मस्क गुजरातमध्ये भारतातील पहिला कारखाना उभारणार असल्याचे वृत्त मिंटने दिले आहे.

रिपोर्टनुसार, टेस्लाची भारतात प्लांट उभारण्याची घोषणा जानेवारीमध्ये व्हायब्रंट गुजरात समिट दरम्यान एलोन मस्क यांच्या उपस्थितीत केली जाईल.

रिपोर्टनुसार, ‘राज्य सरकारने टेस्लाचे उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी साणंद, बेचराजी आणि धोलेरा ही ठिकाणे सुचवली आहेत.’ यापूर्वी गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये टेस्लाचा प्लांट उभारण्याचा विचार होता.

गुजरात सरकारचे प्रवक्ते रुषिकेश पटेल यांनी गुरुवारी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतील, अशी आशा व्यक्त केली आहे. वृत्तसंस्था ब्लूमबर्गने अहवाल दिला होता की टेस्ला सुरुवातीला सुमारे 2 अब्ज डॉलर गुंतवण्याचा विचार करू शकते.

गांधीनगर येथील महात्मा मंदिरात आयोजित करण्यात येणाऱ्या समिटची थीम ‘गेटवे टू द फ्युचर’ अशी ठेवण्यात आली आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये गुंतवणुकीसाठी सर्वाधिक सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे.

गुजरातमध्ये टाटा मोटर्सच्या आगमनानंतर गुजरात ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास आले. राज्यात फोर्ड मोटर्स, टाटा मोटर्स आणि सुझुकी यांचे प्लांट आहेत.

🤙 9921334545