फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश

 नवी दिल्ली : फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या वार्षिक यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये स्थान मिळवलं आहे. या यादीत त्या ३२ व्या स्थानी आहेत.या यादीमध्ये राजकारण आणि धोरणं, व्यवसाय, फायनान्स, मीडिया आणि मनोरंजन अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या जगभरातील प्रभावशाली महिलांचा समावेश आहे. फोर्ब्सनं ६४ वर्षीय निर्मला सीतारामन यांना भारतातील राजकारण आणि धोरणांमधील योगदानासाठी या यादीत स्थान दिलंय.

निर्मला सीतारामन यांच्याकडे २०१९ मध्ये भारताच्या अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यासोबतच त्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रीही आहेत. राजकारणातील कारकिर्दीपूर्वी, सीतारामन यांनी यूके स्थित असोसिएशन ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनियर्स आणि बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या म्हणूनही त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे.

‘या’ भारतीयांचा समावेश

फोर्ब्सनं आपली छाप सोडलेल्या इतर उल्लेखनीय भारतीय महिलांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील रोशनी नाडर यांना या यादीत ६० नं स्थान, व्यवसायात सेलच्या सोमा मंडल यांना ७० वं आणि किरम मुजुमदार शॉ यांना यादीत ७६ वं स्थान दिलंय.

कशी होते निवड?

दरवर्षी, अमेरिकन बिझनेस मॅगझिन जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांची यादी प्रसिद्ध करते. फोर्ब्सनुसार ते चार प्रमुख मेट्रिक्सच्या आधारे रँकिंग निर्धारित केलं जातं: पैसा, मीडिया, प्रभाव आणि प्रभावाचे क्षेत्र. राजकीय नेत्यांसाठी, मासिकानं जीडीपी आणि लोकसंख्या हे त्याचे मापदंड घेतले आहेत, तर कॉर्पोरेट प्रमुखांसाठी, महसूल, मूल्यांकन आणि कर्मचाऱ्यांची संख्या घेतली आहे.