कोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे शनिवार 2 डिसेंबर रोजी सदिच्छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे संचालक अजित नरके यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत म्हणाले कि, सध्या सहकारात काम करणाऱ्या संस्थांना कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे, पण गोकुळने या सर्व कठीण परिस्थितीवर मात करत सहकार क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गोकुळ ही दूध उत्पादक शेतकरी व या प्रक्रियेतील सहभागी घटक अशाच जवळपास पाच लाखापेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार पुरवणारी ही एक अग्रेसर संस्था असून अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सहकारी संस्था कशी असावी याचे एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गोकुळ दूध संघ होय असे गौरवोद्गार पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी काढले, यावेळी गोकुळ प्रकल्पाला भेट दिली असता त्यांनी संघाची दूध उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्षपणे अनुभवली तसेच कामकाजाची माहिती घेऊन कामकाजाचे कौतुक केले. यावेळी गोकुळच्या दर्जेदार उत्पादनांचा हि आस्वाद त्यांनी घेतला व गोकुळच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोकुळ राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती संचालक अजित नरके यांनी दिली.
याप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, गोकुळचे संचालक अजित नरके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,गोकुळ शिरगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड, श्री.जावडेकर, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील,व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, प्रकाश आडनाईक, हणमंत पाटील, बाजीराव राणे,श्री.जोशी व संघाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.