कोल्हापुरात पुन्हा माणुसकीच्या भिंतीची ऊब ४ व ५नोव्हेंबरला सीपीआर चौकात आयोजन..

कोल्हापूर : प्रतिनिधी
कोरोना संसर्ग आणि महापुराच्या काळात बंद झालेली माणुसकीची भिंत हा उपक्रम यंदाच्या दिपावलीपूर्वी पुन्हा सुरू होत आहे. ‘नको असले ते द्या, हवे ते घेवून जा’ हे ब्रिद वाक्य घेवून येत्या शनिवारी आणि रविवारी (४ आणि ५ नोव्हेंबर) पुन्हा माणुसकीची भिंत उभी राहत आहे. कोल्हापूकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेली जूनी परंतू वापरायोग्य कपडे गरजूंना मिळावित या उद्देशाने उभारण्यात आलेली माणूसकीची भिंत सीपीआर चौकात उभी राहत आहे. या दोन दिवसात सकाळी नऊ ते सायंकाळी आठवाजेपर्यंत वापरण्यायोग्य जुनी-नवी कपडे दान करावीत तसेच गरजूंनी त्याचवेळी घेवनू जावीत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा, हे ब्रीद घेऊन माणुसकीची भिंत हा उपक्रम २०१६ पासून सुरू झाला. कोरोना संसर्ग आणि महापुरामुळे मागील चार वर्षे माणुसकीची भिंत हा उपक्रम बंद होता. कोल्हापूरकरांनी मोठा उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. त्यामुळे वापरता येतील असे तीन लाखांहून अधिक कपडे गरजू लोकांपर्यंत पोहाचवता आले. कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचे अनुकरण करीत कोल्हापुरात इतर ठिकाणी, इचलकरंजी, पुणे, मुंबई, बिहार, छत्तीसगड यासह अन्य ठिकाणी माणुसकीच्या भिंती उभ्या राहिल्या. यंदाच्या वर्षी कोल्हापूरकर वापरण्यायोग्य नवे-जुने कपडे माणुसकीच्या भिंतीवर देवून गरीबांची दिवाळी आनंदी करण्यासाठी मदतीचा द्यावा, असे संयोजकांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
या उपक्रमासाठी कपडे देताना ते स्वच्छ धुवून, इस्त्री करुन आणि पुरूष, मुले आणि महिला अशी वर्गवारी करुन दिल्यास ते गरीब गरजूंना अधिक चांगल्या पद्धतीने देता येतील. या उपक्रमाच्या संयोजनासाठी माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांचे पाठबळ असून मुस्लिम बोर्डींगचे चेअरमन गणीभाई आजरेकर, सुधर्म वाझे, उद्योजक प्रशांत पोकळे आणि संदीप नष्टे, डॉ. प्रा. महादेव नरके, संतोष पाटील, सुखदेव गिरी, सचिन पाटील, प्रसाद पाटील, अमर पाटील, सुरज पाटील, निनाद कामत, इम्तियाज मोमीन, डॉ. देवेंद्र रासकर, प्रविण पाटील, आदी परिश्रम घेत आहेत.
………………………………………………………………………….
व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवरील चर्चेतून साकारला उपक्रम

व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवरील चर्चेतून माणुसकीची भिंत उपक्रमाची सुरुवात झाली. त्याला आमदार सतेज पाटील यांचे पाठबळ लाभले. पहिल्या वर्षी तीन दिवसाच्या उपक्रमात २५६९ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घरातील जुनी मात्र, वापरण्यायोग्य १ लाख ७९ हजार ८३० कपडे या उपक्रमासाठी जमा केली होती. सलग तीन वर्षातील उपक्रमात तीन हजारांहून नागरिकांनी अडीच लाखांहून अधिक कपडे दिली. ती गरजूंना वाटप करण्यासह उसतोड कामगारांना पोहोच करण्यात आली होती.

मागील प्रमाणे यंदाच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी सीपीआर चौकात कपडे घेणे व त्याचे वाटप असा दुहेरी उपक्रम होईल. त्यातूनही शिल्लक राहणारे कपडे फिरस्ते, झोपडपट्टीत राहणारे गरजू, रस्त्याच्या कडेला झोपणारे भिकारी, उस तोडणी कामगार अशा वर्गाला या वाटप करण्याचे नियोजन केले आहे. वापरण्यायोग्यच कपडे तसेच शक्य असेल तर नवीन कपडे देवून माणूसकीची भिंत या उपक्रमात सहभागी व्हावे.

……………………………..