बिद्रीने ४०० रूपये दुसरा हप्त्या देण्याचे जाहीर करावे : राजू शेट्टी

बिद्री ( प्रतिनिधी ) : राज्यातील साखर कारखाने मार्च नंतर शिल्लक साखर साठ्याची किंमत सरासरी ३२५० ते ३३०० दाखविले आहेत. कारखान्यांकडे गत गळीत हंगामातील जवळपास ६५ टक्के साखरसाठा शिल्लक आहे. या साखरेला सध्या बाजारात ३७०० ते ३८०० रूपये बाजारभाव मिळू लागले आहेत. यामुळे गेल्या गळीत हंगामातील तुटलेल्या ऊसाला ४०० रूपयाचा दुसरा हप्ता देणे शक्य असल्याने तो तातडीने द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बिद्री कारखाना कार्यस्थळावर केली.

आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने काढण्यात आलेला आक्रोश मोर्चाचे सहाव्या दिवशी बिद्री परिसरात जोरदार स्वागत करण्यात आले. ढोल , ताशा , २५ ट्रॅक्टर व क्रेनच्या सहाय्याने राजू शेट्टी व त्यांच्या सहका-यांना मोठा हार घालण्यात आला. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की कारखानदार व सरकार शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेणे गरजेचे असताना शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. साखर विक्री व उपपदार्थातून मिळालेल्या पैशाची किंमत कमी दाखवून व कागदोपत्री जुळवाजुळव करून ताळेबंद सादर केले आहेत. यावर्षी कारखान्याचा गळीत जास्तीत जास्त ९० दिवस चालणार आहेत यामुळे शेतक-यांनी ऊस तोड घेण्यासाठी गडबड न करण्याचे आवाहन केले.

यावेळी कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील व त्यांच्या संचालक मंडळाने संघटनेच्यावतीने दुसरा हप्ता ४०० रूपये दिल्याशिवाय गळीत हंगाम सुरू न करण्याचे निवेदन स्वीकारले.निवेदनास उत्तर देताना के पी पाटील म्हणाले की शेतक-यांची मागणी योग्य आहे पण सध्या निवडणुका सुरू असल्याने बंधने असल्याने निर्णय घेणे अडचणीचे असल्याचे सांगितले. यावर राजू शेट्टी यांनी आपण निवडणुकीत जाहीरनामा काढणार आहात त्यामध्ये दुसरा हप्ता ४०० रूपये देणार असल्याचे जाहीर करण्यास सांगितले.