कोल्हापूर : “गोकुळमधील सत्ता परिवर्तनानंतर कोट्यावधी रुपयांची बचत केली असा डांगोरा नेते मंडळी आणि सत्ताधारी संचालक मंडळ पिटत असतात. मग ते पैसे गेले कोठे ? गाय दूध खरेदी दरात कपात करायचे कारणच काय ? पैसे बचत केला म्हणता मग ते उत्पादकांना का देत नाही? सत्ताधाऱ्यांनी आपल्या चैनीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे खिसे कापू नयेत” असा हल्लाबोल गोकुळच्या विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केला.
गोकुळ दूध संघाने गाय दूध खरेदी दरात दोन रुपयेची कपात केल्यामुळे दूध उत्पादकामध्ये रोष निर्माण झाला आहे. ठिखठिकाणी आंदोलने होत आहेत. गोकुळ दूध संघाची बोर्ड मीटिंग सोमवारी झाली, या बोर्ड मीटिंगमध्ये संचालक मंडळाने गाय दूध खरेदी दर कपात रद्द करणार नाही असा निर्णय घेतला. सध्या गाईच्या दुधाचे उत्पादन वाढले आहे शिवाय दुधाची पावडर मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याचे कारण सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. महाडिक म्हणाल्या, बोर्ड मीटिंगमध्ये दूध खरेदी दरात केलेली कपात रद्द करून पूर्वीसारखाच दर द्यावा अशी मागणी आपण केली. मात्र सत्ताधाऱ्यांची मानसिकता ही कपात मागे न घेण्याची आहे. सत्ताधाऱ्यांचा हा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. गेले पंधरा दिवस दूध उत्पादक शेतकरी आंदोलन करत आहेत. मी दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकरी जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत मी कायम राहीन. त्यांना आवश्यक ते मदत करेन. प्रसंगी त्यांच्यासोबत रस्त्यावरून आंदोलन करेन.” अशी ग्वाहीही महाडिक यांनी दिली.