कोथळी (दिगंबर संघवर्धन ) : शासन आदेशानुसार शाही दसरा महोत्सव २०२३ अनुषंगाने पारंपारिक वेशभूषा दिवस, न्यु इंग्लिश स्कुल मानबेट/चौके येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सवानिमित्त दसरा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे सदरचा महोत्सव हा कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा राज्य शासनाने राज्याचा महोत्सव म्हणून घोषित केला आहे त्या अनुषंगाने मुख्याध्यापक एस. एम. खडके यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक वेशभूषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विविधतेत एकता असलेल्या आपल्या देशात विविध संस्कृत्या एकोप्याने नांदतात. विविध वेशभूषा, विविध भाषा, विविध जाती धर्म संप्रदाय आणि त्यांच्या विविधांगी, विविधरंगी संस्कृत्यांचे दर्शन विद्यार्थ्यांना घडावे, ते त्यांनी समजून घ्यावे या हेतूने पारंपरिक वेशभूषा दिवस चे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषा करून देशातील विविधतेचे दर्शन घडवले. पंजाबी , बंगाली, गुजराथी, राजस्थानी, महाराष्ट्रीयन , दाक्षिणात्य आदी प्रदेशातील पोशाख घागरा, शेरवानी, पैठणी , नऊवारी साडी, कोळी वेशभूषा, सलवार कमीज, धोतर कुर्ता, शेतकरी , बागायतदार, पंजाबी, शाहीरी यांसारख्या वेशभूषा करून सर्वांनी या पारंपरिक वेशभूषा दिवसाचा मनमुराद आनंद लुटला. संगीताच्या तालावर टिपरी नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी उपस्थित सर्वांना विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम. खडके यांनी संबोधित केले.
भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे आणि तिच्या श्रेष्ठत्वाचे गमक हे याच विविधतेत आहे. या सर्व संस्कृत्यांची मिळून श्रेष्ठ भारतीय संस्कृती तयार झाली आहे. असे मत व्यक्त केले. आणि सर्वांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगायला शिका असा मोलाचा सल्लाही दिला.