आपण अजित पवारांना सिरीयस घेत नाही ; या नेत्याची बोचरी टीका

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. पडळकरांनी अनेकदा शरद पवारांसह पवार घराण्यावर टीका केली आहे. आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत आले आहेत, तेव्हापासून त्यांनी पवार कुटुंबावरील वादग्रस्त विधाने टाळली आहेत.मात्र, पडळकरांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशीही पुन्हा त्यांनी अजित पवारांना आपण सिरीयस घेत नसल्याचं म्हटलं. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, तुम्ही अजित पवारांना पत्र का पाठवलं नाही? त्यावर पडळकर म्हणाले की, ‘अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे’, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

पडळकरांनी सुप्रिया सुळे यांनाही लबाड लांडग्याची लेक, म्हटले. पडळकरांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही पडळकरांवर त्याच भाषेत टीका केली. गोप्या म्हणत पडळकरांना डुकराची उपमा मिटकरी यांनी दिली. दरम्यान, आज सकाळी पुन्हा एकदा पडळकरांनी अजित पवारांना आपण सिरीयस घेत नसल्याचं म्हटलं. आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवार माझ्या पाठीशी उभे राहिले किंवा नाही राहिले त्याचा जास्त फरक पडत नाही. मी अजित पवारांना सिरीयस घेत नाही, मानतच नाही तर सिरीयस घ्यायचा विषयच नाही, असे पडळकर यांनी म्हटले,

माध्यमाशी बोलताना त्यांनी अजित पवारांबद्दलची भूमिका स्पष्ट केली. माझ्या समाजाचा विषय आल्यास मी समाजाच्या बाजुने ठामपणे उभा आहे. अजित पवारांबद्दल बोलायचा किंवा त्यांच्यावर टीका करायचा विषय नव्हता. परंतु, तुमच्यासारख्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला तुम्ही अजित पवारांना पत्र दिलं नाही का, म्हणून ते उत्तर दिलं. कारण, त्यांना पत्र देऊन काही उपयोगच नाही, असेही पडळकर यांनी म्हटले.राष्ट्रवादीकडून पडळकरांना इशारा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकऱ्यांनी मंगळवारी सकाळी गोपीचंद पडळकरांचा निषेध केला.डुकरांची पिल्ले आणून त्यांचं नामकरण केलं.माध्यमांना माहिती देताना राष्ट्रवादीचे सुहास कदम यांनी पडळकराना इशारा दिला आहे.

अजित पवार हे सध्या भाजपसोबत सत्तेत आहेत,आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे बेताल वक्तव्य करत आहेत.सुसंस्कृत पक्षातील नेत्याने किंवा आमदाराने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे असे राष्ट्रवादीने सांगितले.आमदार गोपीचंद पडळकर असेच बेताल वक्तव्य करत राहिले तर राष्ट्रवादी त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे.