लाखावर उपस्थितीने राज्यात रेकॉर्ड ब्रेक उच्चांकी सभा करू: मंत्री हसन मुश्रीफ

कागल : कोल्हापुरात तपोवन मैदानावर एक लाखाहून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उत्तरदायित्व सभा होईल. उच्चांकी गर्दीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक सभा करू, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या सभेला २५ हजारांहून अधिक माता -भगिनी उपस्थित असतील. या सभेला कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातून ३० ते ३५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, असेही ते म्हणाले.

भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, ही उत्तरदायित्व सभा कुणाशीही इर्षा नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कामाचा माणूस आहेत. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे. परंतु; काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उत्तरदायित्व घेण्याची ही सभा आहे. कोल्हापूर शहराच्या थेट पाईपलाईनसह न्यायालयाची इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, शासकीय राजाराम महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ, श्री. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, रंकाळा तलाव संवर्धन, श्री. जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा, केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण, नगरोत्थान योजनेतून रस्ते विकास प्रकल्प यामध्ये अजितदादांचे योगदान मोठे आहे.

सेवक मै तुम्हारा…….

भाषणात मंत्री मुश्रीफ यांनी म्हटलेल्या शेरोशायरीला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. ते म्हणाले, मै चाहता हुॅ कि हर चेहरे पे मुस्कान रहे, खुशहाल हर कोइ मजदूर और किसान रहे, जब तक है जिंदगी रहू सेवक मै तुम्हारा, जमाने मे मेरी खिदमतही मेरी पहचान रहे….!

एक दिवस मुश्रीफांसाठी……

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, लोकनेते मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी उभी हयात गोरगरिबांसाठी खर्ची घातली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कोल्हापूरची सभा महाराष्ट्रात उच्चांकी होण्यासाठी रविवार दि. १० हा फक्त एक दिवस मंत्री मुश्रीफ यांच्यासाठी देऊया आणि कोल्हापूरचा लौकिक महाराष्ट्रभर पोहोचवूया.

कुणीही उपाशी राहणार नाही……!

मंत्री मुश्रीफ म्हणाले, एवढ्या मोठ्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीतही चोख सुरक्षाव्यवस्था व नियोजनबद्धता असेल. कार्यकर्त्यांना सूचना देताना ते म्हणाले, मनापासून व तळमळीने स्वयंसेवक बनवून काम करा. आलेल्या प्रत्येक माणसाची विशेषतः माता-भगिनींची आपले कुटुंबीय समजून काळजी घ्या. सभेला निघाल्यापासून ते परतून घरी जाईपर्यंत सर्वजण सुरक्षित पोहोचतील, याची दक्षता घ्या. सभेला आलेला एकही माणूस उपाशी राहणार नाही, याची जाणीवपूर्वक काळजी घ्या

यावेळी जिल्हा परिषद सदस्य व गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितल फराकटे, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, कोल्हापूर बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील, बिद्रीसाखरचे संचालक प्रवीणसिंह भोसले, जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील- गिजवणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, गडहिंग्लजचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, दत्ता पाटील- केनवडेकर, ॲड. सुधीर सावर्डेकर आदींची भाषणे झाली.व्यासपीठावर गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, वसंतराव यमगेकर, किराणअण्णा कदम, चंद्रकांत गवळी, तात्यासाहेब पाटील, सौ. पद्मजा भालबर, पांडुरंग पाटील, देवानंद पाटील, संजय फराकटे, नारायण पाटील, आर. व्ही. पाटील, राजेंद्र माने, सदानंद पाटील, महेश चौगुले, शिरीष देसाई, दिनकरराव कोतेकर, ॲड. संग्राम गुरव, शिवाजीराव देसाई, नारायण ढोले, संजय चितारी आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कागल तालुका अध्यक्ष विकास पाटील -कुरुकलीकर यांनी केले. प्रास्ताविक केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले.