
जालना : जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. पण त्याआधी पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु पोलिसांवर घेरून दगडफेक झाली. त्यात 12 पोलीस जखमी झाले आणि त्यानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला, असा स्पष्ट खुलासा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
जालन्यातील घटना खरोखर दुर्दैवी आणि गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: त्याठिकाणी असलेल्या उपोषणकर्त्यांशी बोललो होते. आमचा विविध प्रकारे संवाद सुरू होता. त्यांनी उपोषण मागे घ्यावे, कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरपणे काम करत आहे.पण हा विषय न्यायालयाशी संबंधित विषय आहे. तो एका दिवसात सुटणार नाही. तो सोडवण्याकरता वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत, अशाप्रकारे आम्ही त्यांची समजूत काढत होतो. पण ते ऐकत नव्हते.उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. ही राज्याची जबाबदारी आहे की, अशाप्रकारे उपोषण होत असेल, तब्येत खबार होत असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. प्रशासन कालही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले होते.पण त्यांनी तुम्ही उद्या या, असे सांगितले. प्रशासन आज पुन्हा गेले आणि विनंती केली. पण आज पोलिसांना घेरून दगडफेक करण्यात आली. त्या दगडफेकीत 12 पोलीस जखमी झाले. त्यानंतर तिथे पोलिसांनी लाठीमार केला. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
