माझी यापूर्वीच खासदार होण्याची इच्छा होती : शाहू महाराज

कोल्हापूर : राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर २५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात शरद पवार यांची दसरा चौकात भव्य सभा होणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज असणार आहेत. त्यामुळे शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात उतरणार का? अशी चर्चा काही दिवसापासून रंगली आहे. आता स्वतः शाहू महाराजांनीच उमेदवारीच्या या चर्चेवर पडदा टाकला. माझी यापूर्वीच खासदार होण्याची इच्छा होती, अशी प्रतिक्रिया शाहू महाराज यांनी दिली आहे.

शाहू स्मारक भवनातील फोटोग्राफर्स असोसिशनच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या सभेचे निमंत्रण मी स्वीकारले असून त्या सभेला मी उपस्थित राहणार याबाबत दुमत नाही. पण राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी मी इच्छूक आहे असे जे म्हणत आहेत ते त्यांनाच जावून विचारा असे यावेळी शाहू महाराज म्हणाले. महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी इच्छूक आहात का? अशी विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, होय मी खासदारकीसाठी इच्छूक होतो, पण १९९८ च्या निवडणुकीमध्ये इच्छुक होतो.