उद्योजक आण्णासाहेब चकोते ‘‘उद्योगरत्न’’ पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कोल्हापूर तर्फे दिला जाणारा उद्योगरत्न पुरस्कार चकोते ग्रुपचे चेअरमन उद्योजक आण्णासाहेब चकोते यांना महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. महासैनीक दरबार हॉल, कोल्हापूर येथे झालेल्या शानदार सोहळयात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे व्यवस्थापकीय संचालक आणि ट्रस्टी अशोक दुगाडे हे होते तसेच खासदार धनंजय महाडिक हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी यावर्षापासून दिला जाणारा युथ आयकॉन पुरस्कार कृष्णराज महाडिक यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, आण्णासाहेब यांची उद्योग क्षेत्रातील भरारी तरूणांसाठी व नव उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. आपण केलेल्या कामगीरीचे कौतुक वाटते. आण्णासाहेब चकोतेना मिळालेल्या हया पुरस्कारामुळे पुरस्काराची उंची वाढली असून येथून पुढचे पुरस्कारासाठी त्यांच्या तोलामोलाचा उद्योजक निवडावा लागेल असे गौरवोदगार काढले. यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडीक यांनी चकोते साहेब म्हणजे लिजेंड आहेत. एखादी बेकरी म्हणजे एक छोटे दुकान, छोटया एरियामध्ये थोडे फार मशिन्समधून उत्पादन इतकेच डोळयासमोर येते. पण साखर कारखान्यापेक्षा मोठया इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बेकरी उद्योग असु शकतो व इतक्या हायजेनिक कंडीशनमध्ये पारंपारीक पदार्थांचे अॅटोमेशन व तोच जुना स्वाद व अरोमा असा मिलाफ म्हणजेच चकोते ग्रुप. विविध सामाजिक कार्यामध्ये चकोतेंच्या भरीव योगदानाचे त्यांनी कौतुक केले.

फक्त पैसा मिळविणे नव्हे तर उद्योगातून रोजगार निर्माण करणे हा उद्देश हवा. पैसा मिळवून कंटाळा येईल पण या अशा उद्देशामुळे नेहमी प्रेरणा मिळेल, संघर्ष जितका मोठा,यश तेवढेच मोठे असते. मला व्यावसायिक गुरू नाहीत पण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र व घडलेल्या घटनांमधुन मिळालेली शिकवण हेच माझे गुरू आहेत. साधने, पैसा, माणसे याबाबत तक्रारी करत न बसता सातत्य व इच्छाशक्ती बाळगल्यास मार्ग निघत जातात असे सत्काराला उत्तर देताना चकोते साहेब म्हणाले. कोव्हीड काळातील चकोते ग्रुपची वाटचाल पहाता या दोन्ही गोष्टींची प्रचिती येते. सॅटर्डे क्लबकडून सदर पुरस्काराची निवड करताना उद्योगाची पार्श्वभुमी, उद्योगाची वर्षे, उद्योगातुन किती रोजगार निर्मीती झाली, व्यवसायाची उलाढाल, सामाजीक योगदान व जिल्हयातील उद्योग वाढीसाठी प्रेरणा असे 20 निकष लावून 12 असोशिएशन्सच्या ज्युरीं मार्फत माहिती संकलन करून त्यातून ‘‘उद्योगरत्न’’ पुरस्कारासाठी निवड केली जाते.

यावेळी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सचिव जनरल विनीत बनसोडे, डेप्युटी सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस, कोल्हापूर चॅफ्टरचे चेअरपर्सन पिराजी पाटील, डेप्युटी रिजन हेड निलेश पाटील व योगेश देशपांडे, माजी रिजन हेड हर्षवर्धन भुरके, संचालक मिलिंद पाटील, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, श्रीकृष्ण पाटील, विशाल मंडलिक, टी.आर.पाटील, डॉ.मिलिंद परीख, सिध्देश मोहिते, पुनम शहा, ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सभासद व उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.