
कोल्हापूर :आम्ही मंजूर केलेल्या विकासकामांना भेटी देऊन, कोल्हापूरकरांची दिशाभूल करण्याऐवजी त्यांना निधी मंजूर करून आणण्याचा अधिकार असेल तर त्यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी नवीन प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करावेत, त्या निधीसाठी पाठपुरावा करावा आणि निधी मंजूर करून आणून आणि त्याचे श्रेय घ्यावे असे मत आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केले आहे. आमदार जाधव यांनी आज हुतात्मा पार्कला भेट देऊन मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी संवाद साधला व महापालिका अधिकारी व ठेकेदारांची आढावा बैठक घेतली.
यावेळी आमदार जाधव म्हणाल्या, हुतात्मा पार्क व महावीर गार्डनच्या सुशोभिकरणाचा आराखडा दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी तयार केला होता. त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी दोन टप्यात जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर केला होता. आराखडा आण्णांचा, पाठपुरावा माझा, निधीला मंजुरी दिली आमदार सतेज पाटील यांनी आणि त्याचे श्रेय घेत आहेत जनतेने नाकारलेले. जनतेची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी करू नये, कोल्हापूरकरची जनता सुज्ञ आहे. यावेळी हुतात्मा पार्क सुशोभीकरणाचं काम दिवाळीपूर्वी पूर्ण करावे, अशी सूचनाही आमदार जयश्री जाधव यांनी महापालिका अधिकारी व ठेकेदार यांना दिली.