
कोल्हापूर : येत्या 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथे अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री खास. शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.

त्यानिमित्त आज जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर.के.पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर शहर व जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिका-यांची नियोजन बैठक पार पडली.यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांनी पवार यांच्या होणाऱ्या जाहीर सभेच्या नियोजन संदर्भात उपस्थित पदाधिका-यांची मते जाणून घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या. 25 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सायं. 4.00 वा. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथे ही जाहीर सभा होणार असून तत्पूर्वी तावडे हॉटेल ते ताराराणी चौकापर्यंत पवार साहेबांच्या भव्य स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खास.श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष आम.जयंत पाटील व कराडचे आम. बाळासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने दसरा चौक येथील जाहीर सभेस जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कार्यकर्त्ये व पुरोगामी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांनी केले आहे.
यावेळी प्रदेश प्रवक्ते राजू आवळे, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी माने, शहराध्यक्षा पद्मा तिवले, पदवीधर अध्यक्ष अनिल घाटगे, युवक अध्यक्ष रोहित पाटील, नितिन जांभळे, अमर चव्हाण, सुनिल देसाई, चंद्रकांत वाकळे, राजाराम पाटोळे यांच्यासह तालुकाध्यक्ष व महिला उपस्थित होत्या.