
कोल्हापूर: आध्यत्मिक हेच आनंदी, निरोगी आणि पुण्यकारक जीवन असल्याचे मयूर गुरुजीनी आज सांगितले. येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा यज्ञाची उत्साहात सांगता झाली.

शेवटच्या दिवशी उद्धव गीता व भगवंताचे सर्वोत्तमत्व सांगणारी कथा सांगून पुढे भगवंताचे निजधामस गमन सांगण्यात आले. याच्यातून संसाराचे नश्वरत्व व कर्माचा सिद्धांत प्रतिपादित करण्यात आला. यानंतर अत्यंत रमणीय व सुंदर असे मार्कंडेय पुराण सांगण्यात आले. ज्यामध्ये मायेचा विस्तार आणि भगवंताची कृपा याचे वर्णन करण्यात आले. पुढे येणाऱ्या कलियुगाचे वर्णन आणि श्रीमद् भागवत महात्म्य सांगण्यात आले. श्री भागवताच्या सुंदर कथा ऐकून श्रोते मंत्रमुग्ध आणि कृष्णमय झाले होते. आजपर्यंत झालेल्या यज्ञाची सांगता झाली. यामध्ये पुराण संपल्यावर श्रीमद भागवत बंधन संपन्न झाले. यानंतर भाविकांनी अक्षरशः डोक्यावर श्रीमद् भागवत घेऊन आनंदाने विभोर होऊन नृत्य केले. श्रीकृष्ण व श्री भागवताची उत्तम पूजा संपन्न झाली.
यामध्ये तुलसी अर्चना, रत्न व नाण्यांचा अभिषेक झाला. मंत्र, गीत, गजर याने वातावरण दुमदुमून गेले. यानंतर महाभोग झाला. आमंत्रित समस्त देवतांचे विसर्जन करण्यात आले. श्रोतृवर्गाच्या वतीने समाज कल्याणासाठी तुलादान करण्यात आले. सर्वांना प्रसाद म्हणून भागवताच्या आठवणी दिल्या गेल्या. समस्त जगाच्या कल्याणाची प्रार्थना करण्यात आली.दरम्यान, या कार्यक्रमाला अध्यक्ष श्रीनिवास मालू, उपाध्यक्ष मनीष झंवर, सचिव राजेंद्र शर्मा, सुभाष मुंदडा, अशोक अग्रवाल, लक्ष्मीनिवास बियाणी, संजय तोतला यांच्याबरोबर मंदिराच्या सर्व पदाधिकारी, सदस्य, राजस्थानी महिला मंडळ व लक्ष्मी नारायण युवा मंच यांचे सहकार्य मिळाले.
