
कोल्हापूर : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेल वर पाच सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाखाली नियुक्त समिती गणेशोत्सव काळात भेट देईल. समितीला मंडळांनी आपल्या कार्यक्रमाचे फोटो, अहवाल, व्हिडिओग्राफी भेटीवेळी सादर करावेत. स्पर्धेसाठी जिल्हास्तरावरुन राज्यस्तरावर निवड होणाऱ्या एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र सन्मानपूर्वक वितरीत करण्यात येईल. २०२३ मध्ये राज्यातील पहिल्या तीन विजेत्या गणेशोसव मंडळांना राज्य शासनाकडून अनुक्रमे प्रथम क्रमांक पाच लाख रुपये, व्दितीय क्रमांक अडीच लाख रुपये, तृतीय क्रमांक एक लाख रुपये अशी बक्षीसे आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनीप्रदूषण विरहीत वातावरण, सामाजिक सलोखा, प्रबोधनपर देखावे आदी निकषांवर पुरस्कार दिले जाणार आहेत.
