
कोल्हापूर: राज्यातील टोल नाक्यावर वाहनांच्या वाढत्या रांगा, फास्टॅगमधील त्रुटीमुळे सामान्य वाहनधारकांची होणारी आर्थिक लुबाडणूक थांबवा अशी मागणी विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला.

आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे टोल वसुलीला मुद्दा उपस्थित केला. राज्यातील टोल नाक्यांवरील वाहनांच्या वाढत्या रांगामुळे व रोख रकमेला आळा बसावा यासाठी फास्टॅग बंधनकारक केले आहे. मात्र, फास्टॅगमध्ये रक्कम जमा नसल्यास किंवा रक्कम वजा झाल्यास त्यात ऑनलाईन रक्कम जमा करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना नाहक दुप्पट टोल द्यावा लागत आहे. यामाध्यमातून होणारी वाहनधारकांची आर्थिक लुट थांबवण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावर लेखी उत्तर देताना राज्यातील पथकर स्थानकावर फास्टॅग प्रणाली टप्याटप्याने कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. तसेच फास्टॅग मध्ये पुरेशी रक्कम शिल्लक असणे आवश्यक आहे, अन्यथा पथकर स्थानकावर दंडनीय दराने पथकर भरावा लागतो. फास्टॅगसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली नसल्यास त्या फास्टॅग मध्ये ऑनलाईन पध्दतीने रक्कम भरली जाऊ शकत नाही. या प्रणालीत आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील अशी ग्वाही दिली.
