
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काल एनडीएची बैठक पार पडली. यावेळी विरोधकांच्या आघाडीत सर्व भ्रष्टाचारीच असल्याचा आरोप मोदी यांनी केला. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. तुम्ही आमच्यावर आरोप करताय. तुमच्या बाजूलाच 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा, तुमच्यामागे इक्बाल मिर्ची उभा होता. त्याचं काय? ही ढोंगं आता बंद करा, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ वर्षात एनडीए आठवली नव्हती. मित्र पक्ष आठवले नव्हते. आपले सहकारी आठवले नव्हते. पण आम्ही पाटण्याला जमलो. बंगळुरूत भेटलो. त्यानंतर मोदी आणि शाह यांना एनडीए आठवली. याबद्दल एनडीएतील सध्याच्या लोकांनी मोदींचा सत्कार केला पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
