
पावसाळ्यात पोटाच्या विकारात मोठ्या संख्येने वाढ होत असते. त्यामध्ये प्रामुख्याने गॅस्ट्रो आजाराचा त्रास होण्याची अधिक शक्यता असते.
हा आजार उघड्यावरचे खाद्यपदार्थ आणि दूषित पाण्यातून झालेला संसर्ग यामुळे होतो. पावसाळ्यात भेडसावणारा हा आजार कुणाला झाला तर त्या रुग्णाची अवस्था बिकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळी पोटदुखीपासून वेळीच सावध राहण्याची गरज आहे.पोटाच्या विकारांमध्ये विशेष करून अपचन होणे, जुलाब, उलट्या, मळमळ होणे, पोटफुगी, तसेच खाण्याची इच्छा न होणे यासारखे प्रकार पावसाळ्यात होतात. त्यामुळे रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नये किंवा कोणतेही रस्त्यावरचे ज्यूस पिऊ नये. कारण त्यात दूषित पाणी असल्यास त्यामधील सूक्ष्म जंतू पोटात जाऊन पचनक्रियेत बिघाड निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो गरम पदार्थ खावेत, थंड पदार्थ टाळावेत. रस्त्यावर, उघड्यावर मिळणारे हिरवी चटणी लावलेले सँडविच, पाणीपुरी यासारखे खाणे टाळावे. पावसाळ्यात शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे.
