
लोणावळा : पाऊस पडू लागला की मुंबई अन् पुणेकरांचा वीकेंड लोणावळा, खंडाळा, माथेरानमध्ये साजरा होतो. शनिवार, रविवारची सुटी साजरी करण्यासाठी मुंबई, पुणेकर लोणावळासह इतर पर्यटनस्थळी जात आहेत. मागील रविवार लोहगडावर वर्षाविहार करण्यासाठी अनेक जण आले होते. त्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती. पर्यटक अडकून पडले होते. यामुळे पर्यटनस्थळी जाताना नियमांचे पालन करण्यासाठी पोलीस सरसावले आहे.
लोणावळ्यात पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. या ठिकाणी स्टंटबाजी करणाऱ्यांची खैर नाही. मग लोणावळ्यातील वर्षाविहाराऐवजी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसण्याचा आनंद घ्यावा लागू शकतो. पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद शांतपणे घ्यावा. यावेळी हुल्लडबाजी केली तर त्यांची खैर नसणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आता पर्यटनस्थळी आणि परिसरात साध्या वेशात पोलीस असणार आहे. या ठिकाणी पोलिसांची नजर तुमच्यावर असणार आहे.
