
कोल्हापूर : संपूर्ण राजकीय घडामोडी आणि समरजितसिंह घाटगे यांच्याविषयी सविस्तरपणे कागलमध्ये बोलेन असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात बोलताना सांगितले आहे.
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज कोल्हापुरात त्यांचे प्रथमच आगमन झाले.यावेळी शहरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.शहरात त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली होती. कोल्हापुरात ठीक ठिकाणी त्यांचे मंत्रिपदी निवड झाल्यानंतर पोस्टर लावण्यात आले होते. शहरात मुश्रीफ यांच आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.पहिल्यांदा त्यांचे शहरात आगमन झाल्यावर ताराराणी पुतळ्यास पुष्प अर्पण करून ते शाहू समाधीस्थळावर दाखल झाले.येथे त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देऊन शाहू महाराजांना अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी घेतलेला निर्णय आणि राजकीय घडामोडीवर कागलमध्ये सविस्तर बोलेन. समरजितसिंह घाटगे यांच्यावरही कागलमध्ये सविस्तर बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आता कागलमध्ये ते काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
