
तणावाचे व्यवस्थापन हा आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आहे. ताण व्यवस्थापन हे एक आवश्यक जीवनकौशल्य असून, छोट्या छोट्या गोष्टी केल्यास सहज जमू शकतं. मनावरील ताण कमी करण्यासाठी काही सोपे उपाय पाहूयात.
काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा :- आपण ज्या कामात कुशल आहात त्याच्या मदतीने आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याकडे लिहिण्याची कला असेल तर आपल्या भावना लिहा किंवा चित्रकला करा. याचबरोबर आपल्याला जर कोणता छंद असेल तर तो मनापासून जोपासण्याचा प्रयत्न करावा. आपल्या आवडीच्या छंदासाठी दिवसातून किंवा आठवड्यातून थोडा वेळ काढावा यामुळे मनावरील ताण कमी होऊन आपण रिफ्रेश होतो.
नकारात्मक विचार करणे टाळावे :- आपल्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण असलं तरीही आपण त्याचा विचार करणं टाळावे. सतत नकारात्मक गोष्टींचा विचार केल्यास मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सकारात्मक विचार आचरणात आणावेत.
नियमित मेडीटेशन करा :- रोज न चुकता मेडीटेशन करण्याचा आपल्याला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. योगासन आणि ध्यानधारणेमुळे आपल्याला मानसिक शांती मिळते. यासाठी रोज सकाळी नियमित मेडीटेशनचा सराव करावा. हळुहळु सरावाने आपले मन शांत आणि निरोगी होईल. जर आपल्याला मानसिक ताणापासून दूर राहायचे असेल तर नियमित मेडीटेशन करावे.
मित्र – मैत्रिणी कुटुंबासोबत वेळ घालवा :- कामाचा ताण प्रत्येकाला असतोच. मात्र शक्य असेल तर घरी आल्यावर ऑफिसच्या कामाचा किंवा इतर विचार करू नये. शिवाय सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत वेळ घालवा. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालविल्यामुळे आपल्या कामाच्या ताणापासून आपण दूर राहू शकतो. आजकाल सर्वजण घरी आणि घराबाहेर मोबाईल आणि इतर गॅझेट्समध्ये गुंतलेली दिसतात. डिजिटल माध्यमांमुळे आपण आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूरावले जातो. त्यामुळे दिवसभरातील काही तास हे फक्त घरच्यांसाठी राखून ठेवा. गप्पा-टप्पा आणि सुख-दुःख घरच्यांसोबत शेअर केल्यामुळे आपला मानसिक ताण नक्कीच कमी होऊ शकतो.
