
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेने पर्यावरण संवर्धन याकरिता ग्रामपंचायतसाठी पुरस्कार योजना जाहीर केली. हरित महाराष्ट्र संकल्पना व “झाडे लावा – झाडे जगवा” अभियान प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जिल्ह्यातील सगळ्या ग्रामपंचायतीसाठी एकूण ३५ लाख रुपयांची पुरस्कार योजना जाहीर केली.

या योजने अंतर्गत जिल्हास्तरावरील पहिल्या तीन क्रमांकाच्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे 7 लाख, 5 लाख आणि 4 लाख रकमेचे पुरस्कार दिले जाणार आहेत. तर प्रत्येक तालुक्यातून एका ग्रामपंचायत निवडण्यात येणार असून 2 लाख रुपयाचे बक्षीस आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज (बुधवारी) झाली. यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज वसुंधरा ग्रामपंचायत पुरस्कार २०२३ देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. येत्या शाहू जयंतीपासून (२६ जून) या पुरस्कार योजनेला सुरुवात होणार आहे. पुरस्कारासाठी निकष निश्चित केले असून यामध्ये वृक्षलागवड, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, अपारंपारिक ऊर्जा वापर सौर ऊर्जा प्रकल्प बायोगॅस सौरपंप वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग जल प्रदूषण कमी करणे पाणतळ जागांचे संवर्धन व कृषी कचरा व्यवस्थापन फटाके बंदी इलेक्ट्रिक वाहने व चार्जिंग स्टेशन असे आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामपंचायतमध्ये निकोप स्पर्धा असावी व त्यातून पर्यावरणपूरक विविध उपक्रमांची अंमलबजावणी व्हावी हा वसुंधरा ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर करण्यामागे मुख्य उद्देश आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी सांगितले. या पुरस्कार योजनेसाठी जिल्हास्तर मूल्यमापन समिती व तालुकास्तर मूल्यमापन समिती असणार आहे. जिल्हास्तर मूल्यमापन समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता, कृषी विकास अधिकारी, गट विकास अधिकारी मनरेगा, आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांचा समावेश असणार आहे.
तालुकास्तरीय मूल्यमापन समितीमध्ये गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी आणि सहाय्यक गट विकास अधिकारी असे पंचायत समितीमधील अधिकारी असणार आहेत. यंदा जाहीर केलेल्या योजनेचा पुरस्कार वितरण समारंभ पाच जून २०२४ रोजी होणार आहे. दरम्यान ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत शाहू जयंतीपासून रोपांची लागवड करावी. २६ जून ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा अंगणवाडी पशुवैद्यकीय दवाखाने प्राथमिक आरोग्य केंद्र गावठाणातील खाजगी क्षेत्र सार्वजनिक ठिकाणी रोपांची लागवड करावी प्रत्येक ग्रामपंचायतीने एक हजार रोपांची लागवड चे उद्दिष्ट ठेवावे असे आवाहन हे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी केले. या सभेत इतर विषयावर ही चर्चा झाली. अंदाजपत्रकीय दरानेच निविदा काढाव्यात. वाढीव दराने काढलेल्या निविदा मान्य होणार नाहीत असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. खाते प्रमुखानी आपापल्या विभागाच्या योजना सांगितल्या. सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी विषय पत्रिका विषयांचे वाचन केले.
त्यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, महिला व बालकल्याण विकास अधिकारी शिल्पा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, बांधकाम विभागाचे सचिन सांगावकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, जिल्हा कृषी अधिकारी अभयकुमार चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे आदी उपस्थित होते.
