
गारगोटी :युवा ग्रामीण विकास संस्था, गारगोटी (ता.भुदरगड) संस्थेस पाल, ता.भुदरगड कृषी महाविद्यालय (बी. एस्सी.(ॲग्री) (कॉलेज कोड-11305) सुरु करण्यास मान्यता मिळाली आहे.

यावर्षी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय (बी. एस्सी.(ॲग्री) सुरु करण्यास मान्यता मिळालेली असून प्रथम वर्ष गारगोटी येथे सुरु करण्यात येणार आहे. ग्रामीण, डोंगराळ भागात पहिल्यांदाच कृषी महाविद्यालय सुरु होत असल्याने या भागातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची संधी मिळणार आहे. या महाविद्यालयासाठी पाल येथे जागा घेण्यात आली असून सर्वसोयीनियुक्त इमारत बांधण्यात येत आहे. याठिकाणी मुख्य प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळा, संशोधन कक्ष, मुला-मुलींचे स्वतंत्र वसतिगृह उभारले जाणार आहे. सुरुवातीला या महाविद्यालयात ६० विद्यार्थी संख्या राहणार आहे. शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून संशोधन कार्य करण्याचा उद्देश असून स्थानिक पातळीवर कृषी संशोधक तयार करुन शेती समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महाविद्यालयाची मोठी मदत होणार आहे. या महाविद्यालयामुळे कृषी शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. आपला भाग औद्योगिकदृष्ट्या मागासलेला आहे. आपल्या परिसरात शेती व्यवसाय महत्वपूर्ण असून येथील अर्थव्यवस्था पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीत संशोधन करुन दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेताकऱ्यांना प्रोत्साहित करणे हा महाविद्यालयाचा प्रमुख उद्देश आहे. याबरोबर शेतीपूरक असलेला पशुसंवर्धन व्यवसाय आधुनिक पद्धतीने करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. या महाविद्यालयामुळे शेतकरी कुटुंबातील मुलांना तंत्रशुद्ध ज्ञान मिळविण्याचे एक नवीन दालन उपलब्ध झाले आहे.कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणाबरोबरच कृषी पूरक उद्योग विकास, प्रक्रिया केंद्र, शेतकरी प्रशिक्षण केंद्र व सुविधा केंद्र, आदर्श रोपवाटिका संकुल, सर्व कृषी समस्यावर संशोधन असे विविध कृषी विषयक उपक्रम विकसित करण्याचे नियोजन आहे. या संकुलामुळे कृषी शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होतील अशी माहिती प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी दिली असून 9049711305 या संपर्क क्रमांकास संपर्क करावे असे सांगितले आहे.
या महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
