
मुंबई : 20 जून हा दिवस हा लोकशाहीसाठी काळाकुट्ट दिवस आहे.कारण या दिवशी लोकशाहीची व आई सारख्या शिवसेनेची हत्या करून एकनाथ शिंदेंसोबत गद्दार पळून गेले. याची जगातील 33 देशांनी दखल घेतली. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गद्दार दिन घोषित करण्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न करावेत कारण या गद्दारीत त्यांचं देखील योगदान आहे.’ अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

यावेळी ते म्हणाले की, ‘जगातील सर्वात मोठी गद्दारी आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ज्या 40 लोकांनी गद्दारी केली तो इतिहास आपल्या समोर आहे. यापेक्षा भयंकर गद्दारी या जगात कधीही झाली नाही. ज्या आईने तुम्हाला पालन पोषण करून वाढवलं, नाव दिलं, प्रतिष्ठा दिली त्याच आईच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही निघून गेलात. त्यामुळे जसं व्हॅलेंटाईन डे ला आपण फुलं देतो तसं गद्दार दिनाच्या दिवशी गद्दारांना चपला मारण्यासाठी युनायटेड नेशन्स ने गद्दार दिवस जाहीर करावा. ही जनतेची मागणी असून मी त्याचा पाठपुरावा करणार आहे.
