
कोल्हापूर : जिल्ह्यात दुर्गम तालुक्यांमध्ये गव्यांचा उच्छाद कायम आहे. आजरा तालुक्यात ऊसाच्या शेतात भांगलणीसाठी गेलेली महिला गव्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाली. पेरणोली गावात झालेल्या या घटनेत शालन विष्णून दारूडकर (वय 48) या गव्याने त्यांना पाठीमागून धडक दिल्याने त्या जमिनीवर कोसळून जखमी झाल्या.

आजरा येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शालन या शेतात ऊस भांगलण करण्यासाठी गेल्या होत्या. हिरण्यकेशी नदी पार करून गव्यांचा कळप ऊसात शिरला. गव्यांचा कळपाचा मोठा आवाज आल्याने भांगलणीसाठी आलेल्या महिलांनी शेतातून पळ काढला. यावेळी पाठीमागून वेगाने आलेल्या गव्याने पाठीमागून धडक दिल्याने शालन जमिनीवर कोसळल्या. गव्यांचा कळप निघून गेल्यानंतर शेतातील महिलांनी माहिती देताच ग्रामस्थांनी शेतात धाव घेत त्यांना उपचारासाठी दाखल केले. • जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यात गव्यांचा थेट वावर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, भुदरगड आणि गगनबावडा या दुर्गम तालुक्यातील अनेक गावांमध्ये गव्यांचा थेट वावर वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण आहे. गवे थेट मानवी वस्तीत प्रवेश करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रखर उन्हाळ्यामुळे गव्यांचा अधिवास असलेल्या परिसरात पाणी नसल्याने तसेच चाऱ्याच्या शोधात गवे मानवी वस्तीच्या दिशेने येत आहेत. गव्यांकडून पिकांचे नुकसान करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसाव लागत आहे.
