आदीपुरुष चित्रपटाबाबत निर्माते-दिग्दर्शकांनी मोठा निर्णय

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या सोशल मीडियावरील प्रचंड ट्रोलिंगनंतर अखेर निर्माते-दिग्दर्शकांनी मोठा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटातील वादग्रस्त डायलॉग्स बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. टी-सीरिजच्या अधिकृत प्रवक्त्याने याबाबतची माहिती दिली आहे. त्याचसोबत संवादलेखक मनोज मुंतशीर यांनीदेखील ट्विट करत डायलॉग्स बदलणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘मी आणि चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांनी ठरवलंय की जे संवाद तुम्हाला खटकले आहेत, त्याविषयी आम्ही अभ्यास करू आणि या आठवड्यात सुधारित संवाद चित्रपटात समाविष्ट करू’, असं त्यांनी म्हटलंय. मात्र याच ट्विटमध्ये त्यांनी टीकाकारांवर नाराजी व्यक्त केली आहे.

‘तीन तासांच्या चित्रपटात मी 3 मिनिटांसाठी तुमच्या कल्पनेपेक्षा वेगळं काहीतरी लिहिलं असण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी माझ्या कपाळावर सनातन-द्रोही लिहिण्याची तुम्हाला इतकी घाई का झाली हे मला कळलं नाही. तुम्ही जय श्री राम गाणं ऐकलं नाही का? शिवोहम ऐकलं नाही का? राम सिया राम ऐकलं नाही का? आदिपुरुषमधील सनातनची ही स्तुतीही माझ्या लेखणीतूनच जन्माला आली आहे. तेरी मिट्टी आणि देश मेरे ही गाणीसुद्धा मीच लिहिली आहेत’, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

🤙 8080365706