
सगळ्या शाळांमध्ये भाजी-पोळी कंपल्सरी केलेली आहे. पण त्यातूनसुद्धा पोषक तत्त्व मिळतीलच, असे नाही. पदार्थ बनविल्यानंतर जसजसा वेळ वाढत जातो, तसतशी त्यातील पोषक तत्त्व कमी होत जातात. त्यामुळे डब्यात पदार्थ किती वेळ असणार आहे, त्याप्रमाणे कोणता पदार्थ द्यायचा हे ठरवावे. त्याचप्रमाणे वातावरणातील तापमान कसे आहे हे पाहून डब्यात पदार्थ ठरवावा.आता हे पदार्थ कसे ठरवायचे हे पाहू.

पदार्थ बनविल्यानंतर जसजसा वेळ वाढत जातो, तसतशी त्यातील पोषक तत्त्व कमी होत जातात. त्यामुळे डब्यात पदार्थ किती वेळ असणार आहे, त्याप्रमाणे कोणता पदार्थ द्यायचा हे ठरवावे.
मुलांना स्टेनलेस स्टीलचाच डब्बा वापरावा. कितीही चांगल्या क्वालिटीचे असले तरी प्लास्टिक अजिबात वापरू नये. मुलांना डब्यात ब्रेड, बेकरीचे पदार्थ देऊ नयेत९. प्रक्रिया केलेले पदार्थ जसे की टोमॅटो सॉस, मेयो, पाकिटातील चटण्या अजिबात देऊ नये, त्यापेक्षा घरी केलेली लोणची, चटण्या, मुरंबा केव्हाही चांगला.
थंडीच्या दिवसात मुलांची पचनशक्ती चांगली असते, त्यावेळी मुलांना पचायला जड असलेले पदार्थ दिले तरी चालतात. ज्या पदार्थांमध्ये प्रथिने जास्त असतात, ते पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते..उदा उन्हाळ्यात वरण किंवा डाळ लवकर खराब होते. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त प्रथिने असलेले पदार्थ देणे टाळावे. डब्यात पदार्थ कोरडे असावेत. कारण, पाणी जास्त असलेले पदार्थ लवकर खराब होतात. डब्यात तळलेले पदार्थ नसावेत. कारण, मधल्या सुटीनंतर मुलांना परत अभ्यास असतो त्यात त्यांना सुस्ती येऊ शकते. मुलांना गोड पदार्थ डब्यात देणे प्रकर्षाने टाळावे. एकतर गोड पदार्थांची सवय होऊ शकते आणि मुलांना शाळेत झोप येऊ शकते.
