
मुंबई : भारताची भविष्यातील सामाजिक सुरक्षा, आर्थिक भागीदारी आणि रोजगार निर्मितीसाठी तरुणाईने आपले योगदान द्यावे. तसेच आर्थिक विषमता दूर सारून आर्थिक समता प्रस्थापित करावी असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं.

विद्यार्थी वर्गाची ध्येय ही भारताच्या आर्थिक वाढीसाठी पोषक आहेत. युवकांची व्यक्तिमत्वे, व्यावसायिक दृष्टिकोन, संघकार्याची भावना, तंत्रस्नेही कौशल्ये अजून विकसित व्हायला हवीत असेही गडकरी म्हणाले. वनामती नागपूर येथे आयोजित ‘मेगा सीए स्टुडन्ट कॉन्फरन्स ‘ या भारतीय सनदी लेखापाल संस्थेनं आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते. भारताला आता ऊर्जेचा आयातदार होण्यापेक्षा ऊर्जेचा निर्यातदार होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक गोष्टीचे लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान, आर्थिक शाश्वती, कच्च्या मालाची उपलब्धता आणि नवीन बाजारपेठांची निर्मिती हे भांडवली गुंतवणुकीसाठी आवश्यक असून याच्या निर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घावा. त्याचप्रमाणे पाणी, ऊर्जा, बांधकाम, तंत्रज्ञान हे रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे असे घटक आहेत त्यांचे सशक्तीकरण होणे आवश्यक असल्याचे गडकरी म्हणाले.
