
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे.

हे सरकार पुढच्या दोन महिन्यात सत्तेवर राहणार नाही. हे सरकार अंतर्विरोधाने पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्याची मुदत दिली आहे. त्या आधारे दोन महिन्यात हे सरकार जाईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. शिंदे गटाने सरकारी जाहिरातीतून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो वगळला आहे. जाहिरातीत चित्र स्पष्ट असलं तरी सर्व काही अलबेल नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे. विधानसभा अध्यक्षांनी काहीही म्हटलं तरी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसारच निर्णय द्यावा लागेल. हे सरकार अपात्र ठरेल आणि हे सरकार दोन महिन्यात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
