
गलगले : मारुतराव जाधव गुरुजी हे सहकारातील एक तज्ञ अभ्यासक आहेत. त्यांच्याबद्दल मला आदरच आहे. परंतु बिद्री साखर कारखान्यात सत्ताधाऱ्यांनी ९६ कोटींचा ढपला पाडल्याचा त्यांचा आरोप हास्यस्पद आहे असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या बिद्रीवरील या आरोपांच्या चर्चेसाठी आपण एकाच व्यासपीठावर येऊया असेही आमदार मुश्रीफ म्हणाले.

गलगले ता. कागल येथे विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाडगे होते बिद्रीचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.**भाषणात आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले, बिद्रीची निवडणूक पुढे ढकलून रडीचा डाव खेळू नका थेट मैदानात या.आजच्या घडीला साखर कारखानदारी प्रचंड अडचणीतून जात आहे. इथेनॉल प्रकल्प नसेल तर टनाला चारशे रुपये तोटा सहन करून कारखाने चालवावे लागत आहेत. विरोधकांना माझी विनंती आहे. इथेनॉल प्रकल्पाला विरोध करून नका. पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आलेला इथेनॉल प्रकल्प थांबवून तुम्ही काय साधणार आहात? बिद्री साखर कारखान्याने राज्यात उच्चांकी ऊसदराबरोबरच कामगारांचे पगार ऊस तोडणी वाहतूक बिले 60 हजार शेतकरी सभासदांना सवलतीची साखर यासह ऊस विकासाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविले आहेत.
माजी आमदार संजयबाबा घाडगे म्हणाले, राजकीय समीकरणांमुळे एकेकाळी बिद्री साखर कारखाना निवडणुकीत आम्ही सुद्धा के पी पाटील यांच्या विरोधात होतो, परंतु कारखान्याच्या कारभारावर किंवा वैयक्तिक के पी पाटील यांच्यावर कधी टीका केली नाही. आता तर आम्ही त्यांच्या सोबतच आहोत.
मालमत्ता ६५ कोटींवरून ४०० कोटींवर…………
बिद्रीचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील म्हणाले २० वर्षांपूर्वी सभासदांनी कारखान्याची सत्ता माझ्या हातात दिली. त्यावेळी कारखान्याची मालमत्ता ६५ कोटी रुपये होती. आजघडीला कारखान्याची ही मालमत्ता ४०० कोटींहुन अधिक आहे. शेतकरी सभासदांच्या मालकीचे श्रमाचे हे सहकार मंदिर आहे.
