खुपीरेतील चोरीला गेलेल्या रस्त्याची कागलच्या पथकाकडून तपासणी

कुडित्रे : खुपीरे (ता. करवीर) येथील चोरीला गेलेल्या रस्त्याची नुकतीच कागलच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली.

खुपिरे (ता. करवीर) गावातील सन २०१०-११ साली झालेल्या मंजूर रस्त्यातील ५० मीटर रस्ता केला नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १० वर्षांनी निदर्शनास आल्यावर आणि त्यांनी त्यासाठी जिल्हा परिषदेत आंदोलन केले होते. खुपिरेत दलित वस्ती सुधारणा योजनेतून सन २०१०-११ मध्ये संजय कांबळे यांचे घर ते काशीनाथ कांबळे यांचे घर हा १३० मीटरचा रस्तानखडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी मंजूर झाला. तशी नोंद खुपिरे ग्रामपंचायत रजिस्टरला देखील आहे. परंतु प्रत्यक्षात ८० मीटरचे काम करून बिल मात्र १३० मीटरचे अदा करण्यात आले आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेत मनसेचे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले आणि जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी या सर्व प्रकरणाशी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करा आणि रस्ताही करून द्या, अशी मागणी करण्यात आली होती. तेव्हा कारवाईचे आश्वासन चव्हाण यांनी दिले होते. शुक्रवारी कागल येथील समितीने संबंधित रस्त्याचे मोजमाप केले. यामध्ये उप अभियंता अमित पाटील यांच्यासह कमिटीने मोजणी मापे घेतली आहेत.