
संभाजीनगर : एकाच कुटुंबातील पती-पत्नीने पाच वर्षीय मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या करण्यात आल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना वाळूज परिसरात वळदगाव येथे शुक्रवारी तारीख 19 रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील वळदगाव येथे मोहन प्रतापसिंग डांगर (वय 30), पूजा मोहन डांगर (वय 25) व श्रेया (वय पाच) वर्ष असे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.मोहन डांगर हे वळदगाव येथे भाड्याच्या घरात राहून शेती करत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. घटनेपूर्वी गुरुवारी कुटुंब जेवण करून रात्री झोपले, त्यानंतर रात्री हा अत्यंत हृदय पिळवटून टाकणारा प्रकार घडला.सासर-माहेर एकाच गावात असलेल्या पूजाची मुलगी श्रेया ही दररोज सकाळी शेजारीच राहणाऱ्या आजीकडे जात असते. शुक्रवारी सकाळी मात्र ती न आल्याने आजी तिला पाहण्यासाठी डांगर यांच्या घराकडे गेली असता ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तिघांचेही मृतदेह घाटीत रवाना केले. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचे कारण अध्याप समजू शकले नाही.
