हिरण्यकेशीवर आठ दिवस उपसाबंदी : कार्यकारी अभियंता – स्मिता माने

कोल्हापूर : चित्री मध्यम प्रकल्पांतर्गत हिरण्यकेशी नदीवर यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा उपसाबंदी लागू होणार आहे. 22 ते 29 मे अशी 8 दिवस ही उपसाबंदी राहणार आहे. आजरा तालुक्यातील भादवण बंधाऱ्याच्या खालील बाजूपासून गडहिंग्लज तालुक्यातील खणदाळ बंधाऱ्यापर्यंत नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतीपंपांना ही उपसाबंदी लागू राहणार आहे, अशी माहिती पाटबंधारेच्या (दक्षिण) कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी दिली आहे. दरम्यान शुक्रवार 19 मे पासून सदरची उपसा बंदी लागू होणार होती मात्र लाभधारक शेतकरी, लोकप्रतिनिधी तसेच संघटना यांच्या मागणीनुसार या उपसाबंदीमध्ये बदल करण्यात आला आहे.

चित्री प्रकल्पाचे पाणी पिण्याच्या वापरासाठी नांगनूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही उपसाबंदी करण्यात आली आहे. या कालावधीत शेतीकरिता अनधिकृत पाणी उपसा केल्याचे आढळल्यास संबंधितांचे उपसायंत्र जप्त करण्याबरोबरच उपसा परवाना रद्द करण्याचे आदेश पारित केल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, चित्री आणि आंबेओहोळ मध्यम प्रकल्पातून हिरण्यकेशी नदीत शुक्रवारपासून शेवटचे एकत्रित आवर्तन सुरू होणार आहे. याकरिता उपसाबंदी लागू करण्यात आली. दोन्ही प्रकल्पांतून अंदाजे १०० एमसीएफटी पाणीसाठा शेवटच्या आवर्तनासाठी वापरला जाणार असून, उर्वरित पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार.

🤙 8080365706