महसूल प्रशासनामुळे धामणीवासियांचे स्वप्न लांबणीवर

राधानगरी : धामणीवासियांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणारा राई ता. राधानगरी येथील धामणी मध्यम प्रकल्प गेली २३ वर्षे रखडला आहे.३.८५ टी.एम.सी क्षमता असलेला प्रकल्प पूर्णत्वाकडे जाईल या आशेवरती धामणीवासीय वाट पाहत आहेत. पण गेल्या सहा महिन्यापासून महसूल प्रशासनाच्या चालढकलपणामुळे पुनर्वसन व कॅनॉलचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. पुनर्वसनाचा प्रश्न जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत धामणीवासियांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार होणार नाही हे तितकेच सत्य आहे.

लोकप्रतिनिधी सातत्याने यावर आवाज उठवत असताना, बैठकांचे नियोजन करताना देखील महसूल प्रशासन चालढकल करण्यामागचे कारण काय? हा चर्चेचा विषय बनला आहे. नवीन प्रशासकीय मान्यतेनुसार शंभर कोटीची तरतूद करून प्रकल्पस्थळी कामाला सुरुवात देखील झाली आहे. काही दिवसापूर्वी आ.प्रकाश आबिटकर यांनी पाणी पूजन प्रसंगी येत्या दिवाळीपर्यंत घळभरणीचे काम सुरू करण्याचे आश्वासन देऊन त्यादृष्टीने प्रयत्नही चालू केले.पण महसूल प्रशासनाच्या या कुचकामी नियोजनामुळे पुनर्वसनाचा प्रश्न प्रकल्पपूर्तीमध्ये अडथळा निर्माण करू लागला आहे.यामध्ये लोकप्रतिनिधी व महसूल प्रशासन अधिकारी यांच्यात खटके उडू लागले आहेत. म्हणजेच पाण्याचे नियोजन भावना शून्य व्यक्तीच्या ताब्यात गेल्यामुळे त्यामध्ये पाण्याचा ओलावा कमी व बुद्धीचा काथ्याकूठ जास्त मिसळला जात असल्याचे चित्र पाहायला मिळते.पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढणे व कॅनॉल सर्वे करून मूल्यांकन करणे या गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत घळभरणीचे काम चालू करता येत नाही. त्यामुळे आता पुनर्वसन झाले तरच येत्या नोव्हेंबरला घळभरणी सुरू करता येईल .पण या दृष्टीने कोणतीही हालचाल दिसत नाही.जोपर्यंत प्रकल्पा मध्ये असणारी शेटेवाडी, राणेवाडी या गावच्या राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत घळभरणी काम चालू करता येत नाही .तत्पूर्वी जिल्हाधिकारी , पुनर्वसन, पाटबंधारे अधिकारी व पुनर्वसनग्रस्त यांच्यात अनेकदा बैठका झाल्या पण झालेल्या बैठकीत ३०मुद्द्यापैकी तीन-चार मुद्दे सोडले तर बाकीच्या बाबतीत कोणताच कागद पुढे सरकलेला दिसत नाही. त्यामुळे महसूल प्रशासनाचा चालढकलपणा धामणी प्रकल्पाच्या मार्गात आडकाठी ठरत आहे.यातून अधिकाऱ्यांना धामणी खोऱ्यातील लोकांच्या भावनांशीच काही देणे घेणे नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे धामणीवासियांनी पाहिलेलं हरितक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी आणखी किती वेळ लागणार? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे .

🤙 8080365706