
कोल्हापूर : कोल्हापुरातील रुईकर कॉलनी परिसरात असणाऱ्या बंगल्यात काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे.

चोरट्यांकडून वीस तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15 हजार रुपयांची रोकड ,दुचाकीची चोरी करण्यात आली आहे.रुईकर कॉलनीत राहणाऱ्या निरंजन वायचळ यांच्या बंगल्यात सुरज हिराप्पा सुतार हे भाड्याने राहतात. काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकी तोडून घरात प्रवेश केला यावेळी घरामध्ये सुरज सुतार हे आपल्या पत्नी, मुलगी आणि भाच्यासह बंगल्यातील एका रूममध्ये झोपले होते. चोरट्यांनी बंगल्यातील एका रूममधील कपाटातील साहित्य विस्कटून कपाटात असणारे 20 तोळे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजारांची रोकड लंपास केली.यानंतर बंगल्यातील सुतार यांची दुचाकी घेऊन ते पसार झाले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातील लोक उठल्यानंतर त्यांना बंगल्यात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेच शाहूपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला याबाबतची माहिती दिली.सध्या पोलीस या बंगल्या नजिकच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
