
कोल्हापूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा संघटनात्मक बळकटीसाठी असला, तरी या दौऱ्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय अडचणी वाढणार का, असे तर्क वितर्क राजकीय वर्तुळात लढवले जात आहेत. याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय नेतृत्व मुंबईत विनोद तावडेंना बळ देताना दिसत आहे.

विनोद तावडे हे सध्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असून महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात.नड्डा यांचा हा दौरा लोकसभा निवडणुकीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आहे. मात्र, या दौऱ्यात ते बोरिवलीत तावडे यांच्या आमदारकीच्या काळात बांधलेल्या अटल स्मृती उद्यानालाही भेट देणार आहेत. याशिवाय नड्डा हे तावडेंच्या घरी स्नेहसंमेलनासाठीही जाणार आहेत. या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुंबई दौऱ्यावर असताना तावडे यांच्या घरी भेट दिली होती. केंद्रीय नेतृत्वाने तावडेंना विशेष महत्त्व दिल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या समर्थकांमध्ये राजकीय अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
